कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; ‘या’ 18 गावांचा समावेश
मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेली कित्येक वर्षे रेंगाळत पडला असताना आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे संकेत दिले आहेत. हद्दवाढीला शहरालगतच्या 19 गावांचा विरोध असला तरी आता मुख्यमंत्र्यांनीच हद्दवाढीचा विषय मनावर घेतल्याने कोल्हापूरची हद्दवाढ दृष्टिक्षेपात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हद्दवाढीवरून सुरू असलेला संघर्ष अद्याप थांबलेला नाही.

गेली कित्येक वर्षांपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या केवळ चर्चा सुरू आहेत. एकीकडे कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, यासाठी कोल्हापूरकर प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे हद्दवाढ होऊ नये, म्हणून ग्रामीण भागातील जनता त्याला विरोध करत आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगरपालिकेची हद्द 1972 पासून 66.82 चौ.कि.मी. इतकीच आहे. त्यामुळे शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. महापालिकेने हद्दवाढीसाठी तब्बल 6 वेळा प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, राजकीय विरोधामुळे हे प्रस्ताव अद्याप मंजूर झालेले नाहीत.
आता कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे, त्याशिवाय शहराचा विकास होणार नाही, अशी भूमिका खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या सभेत मांडली. एवढंच नव्हे तर ज्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांच्या शंभर टक्के अडचणी मी सोडवतो, असं आश्वासनही त्यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ आता दृष्टिक्षेपात असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, हद्दवाढीच्या या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दलही चर्चा सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही लोकप्रतिनिधी हद्दवाढीला विरोध करत असल्याचं सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून हद्दवाढ किती गरजेची आहे, हे त्यांनी सांगितलं आहे.
तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कोल्हापूर शहराची हद्दवाढ गरजेची असल्याचं म्हटलं आहे. आता ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांची भेट घेऊन हद्दवाढीचं महत्त्व पटवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच हद्दवाढीला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना विश्वासात घेतलं जाणार असल्याचंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
प्रस्तावित हद्दवाढीमध्ये कोल्हापूर शहरालगतच्या 18 गावांचा समावेश करण्याचा विचार आहे.या गावांमध्ये —भुये,शिरोली,गांधीनगर,उचगाव,सरनोबतवाडी,उजळाईवाडी,मोरेवाडी,पाचगाव,कळंबा तर्फ ठाणे,वाडीपीर,बालिंगे,नागदेववाडी,शिंगणापूर,वळीवडे,कंदलगाव,गोकुळ शिरगाव,तामगाव,मुडशिंगी..या गावांचा समावेश प्रस्तावित असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. मात्र, तरीही कोल्हापुरात दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. एकीकडे ग्रामीण भागातील लोकांचा हद्दवाढीला विरोध आहे, तर दुसरीकडे शहरातील नागरिकांचा हद्दवाढ करण्याकडे जोर आहे.
एकूणच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर हद्दवाढ गरजेची असल्याचे संकेत दिल्यामुळे आता लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे. आगामी काळात कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना लोकप्रतिनिधी विश्वासात कसे घेणार? आणि हद्दवाढीचा हा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




