खाकी वर्दीतच पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत संपवलं आयुष्य; हिंगोली पोलीस दलात खळबळ
मुंबई (प्रतिनिधी) : हिंगोली जिल्हा पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली पोलीस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आपले आयुष्य संपवले. अमोल गंगलवाड (50) असं मृत पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. खाकी वर्दीत असतानाच पोलीस अधिकाऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याने हिंगोली पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे रुळावर ही घटना घडली. पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेनची अमोल गंगलवाड वाट पाहत उभे होते. रेल्वे जवळ येताच त्यांनी अचानक धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने पोलीस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती रेल्वेच्या लोको पायलटने तातडीने हिंगोली रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
अमोल गंगलवाड यांची दोन महिन्यांपूर्वीच परभणी पोलीस दलातून हिंगोली पोलीस दलात बदली झाली होती. अत्यंत मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.




