जंतरमंतरवर आंदोलन तापलं! महिला आंदोलकाला थप्पड, ADCP वर कारवाई

जंतरमंतरवर आंदोलन तापलं! महिला आंदोलकाला थप्पड, ADCP वर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकाला थप्पड मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या ADCP संदीप लांबा यांच्याविरोधात मोठी कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्हिडीओ समोर आल्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांना त्यांच्या मूळ पोस्टिंगवर परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले.

'काँकरोच जनता पार्टी'च्या 'संसद चलो' मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक सहभागी झाले होते. आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचवेळी समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये ADCP संदीप लांबा शांत उभ्या असलेल्या महिला आंदोलकाच्या कानशिलात मारताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या घटनेची दखल दिल्ली उच्च न्यायालयातही घेण्यात आली. सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांनी न्यायालयासमोर हा मुद्दा उपस्थित करत, व्हिडीओतील अधिकारी संदीप लांबा यांना न्यायालयात हजर करून त्यांच्या वर्तनाबाबत स्पष्टीकरण मागवण्याची मागणी केली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26 वा दिवस आहे. सध्या त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांनी काही अटींसह उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. आंदोलनातील विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, दंड आकारला जाणार नाही आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांना न्याय, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सरकार आणि आंदोलक यांच्यात अद्याप तोडगा निघालेला नाही.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मोठी घोषणा केली. पेपर लीकच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. युवकांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.