जयंत पाटील-तावडे भेटीवरून चर्चांना उधाण; आमदार नाराज?
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या भवितव्याबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ पक्ष आहे आणि तो महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्यापेक्षा त्या त्यांच्या नेतृत्वावर सोपवणं योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला."काही दिवसांपूर्वी माझं सुप्रियाताईंशी बोलणं झालं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पक्षाच्या विलिनीकरणाबाबत किंवा इतर सुरू असलेल्या चर्चा या केवळ अफवा आहेत,"असं राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत यांनी सत्ताधारी पक्षावरही टीका केली. विरोधी पक्षांमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी या नैसर्गिक नसून बाह्य शक्तींमुळे निर्माण केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, प्रादेशिक पक्ष कमकुवत व्हावेत, अशीच केंद्रातील नेतृत्वाची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीतील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. आमदारांनी निधी, संघटन आणि पक्षाच्या भविष्यासंदर्भातील भूमिका जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्याचं बोललं जात आहे. याबाबत विचारलं असता, राऊत यांनी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
"जयंत पाटील हे शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे नेते आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या विचारांशी तडजोड करून वेगळी राजकीय भूमिका घेतील, असं वाटत नाही," असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
तसेच, राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारही पुरोगामी विचारांचे असल्याने पक्षात मोठी फूट किंवा वेगळा निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चांवर राऊत यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.




