जयकुमार गोरेंवरून वाद वाढला; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची जहरी टीका

जयकुमार गोरेंवरून वाद वाढला; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची जहरी टीका

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोलापूरातील राजकारण चांगलेच तापले आहे. राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि भाजपने निषेध आंदोलन केल्यानंतर आता ठाकरे गटाचे शिवसैनिक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

ज्या चार हुतात्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते, त्याच ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. यावेळी आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी जयकुमार गोरेंवर जोरदार टीका केली.

प्रताप चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना जयकुमार गोरे यांच्यावरही आक्षेपार्ह शब्दांत निशाणा साधला. तसेच, सोलापुरातील विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करत मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला.

दरम्यान, जयकुमार गोरे यांच्या विरोधात आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या वादाची सुरुवात जयकुमार गोरे यांच्या एका वक्तव्याने झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व उरले नसल्याचा टोला लगावत त्यांनी पक्षावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. या प्रकरणी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उमटले आहेत. मोहोळ तालुक्यातील अनगर येथे भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेध केला. तर दुसरीकडे, जयकुमार गोरे यांनी "कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही," अशी प्रतिक्रिया देत या वादावर भाष्य केले.