ठाकरे गटाला ओम बिर्लांचा तातडीचा निरोप; 'आजच या आणि तुमची बाजू मांडा'

ठाकरे गटाला ओम बिर्लांचा तातडीचा निरोप; 'आजच या आणि तुमची बाजू मांडा'

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या बंडानंतर आता दिल्लीतून एक मोठी घडामोड समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या या खासदारांमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरे गटाला भेटीसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, "तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांसमोर या," असा स्पष्ट संदेश ठाकरे गटाला देण्यात आला आहे. आज, 24 जून रोजी सायंकाळी 5 वाजता ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.या बैठकीत ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला कोणतीही मान्यता देऊ नये, अशी जोरदार मागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाच्याही दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या कथित 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 16 जून रोजी संध्याकाळी हे सहा खासदार दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, 17 जून रोजी सकाळी या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र सादर केल्याची माहितीही समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट आपली भूमिका अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षांसमोर मांडणार आहे. बंडखोर खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळणार का? ठाकरे गटाच्या आक्षेपांची दखल घेतली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा पुढील निर्णय नेमका काय असणार?या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता दिल्लीतील या महत्त्वाच्या बैठकीकडे लागले आहे.