"ठाकरे गटाला मोठा धक्का! ओमराजे निंबाळकरांचा आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा, पक्षांतरावर मोठं वक्तव्य"
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतराच्या चर्चांदरम्यान प्रथमच सविस्तर भूमिका मांडत पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे.एका मुलाखतीत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. ते म्हणाले की, हे दोन्ही नेते सातत्याने जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फिरत असतात. उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याच्या मर्यादा समजू शकतात, मात्र आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

पक्ष सोडण्याच्या निर्णयाबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर भावूक झाले. त्यांनी सांगितले की, भावनिकदृष्ट्या हा निर्णय कठीण वाटत असला तरी राजकीय वास्तव पाहता तो योग्य असल्याचे त्यांना वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःचे कार्यकर्ते निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी त्यांची चिंता आहे.
मतदारसंघातील विकासकामांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रस्ते, पूल आणि इतर मूलभूत सुविधांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अनेक कामे रखडल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत नसल्यामुळे निधी मिळवण्यात अडचणी येतात आणि त्यामुळे जनतेची कामे प्रभावीपणे करता येत नाहीत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर किंवा विशेष सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावले आहे. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी असून कार्यकर्त्यांचाही त्यांच्यावर मोठा दबाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर आणि सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच 20 जूननंतर अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचेही ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे.आता ओमराजे निंबाळकर नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




