तरुणांनी सरकारची मस्ती उतरवली ; शंभर अपराधांनंतर तरुणाईने सुदर्शन चक्र वापरलं ; अंबादास दानव्यांचे केंद्र सरकारवर तीव्र प्रहार
मुंबई: 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणी देशभरातील विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "शंभर अपराधांनंतर श्रीकृष्णाने जसे सुदर्शन चक्र वापरले होते, तसेच या सरकारचे शंभर अपराध भरल्यानंतर देशातील तरुणाईने सुदर्शन चक्र वापरले आहे," असा प्रहार दानवे यांनी केला.

"राजीनामा दिला नसता तर हे सरकार भस्मसात झाले असते"
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना दानवे म्हणाले, "हा राजीनामा तर व्हावाच लागणार होता. देशभरात तरुणांचा जो प्रचंड रोष होता, त्यापुढे सरकारला झुकावेच लागले. जर त्यांनी राजीनामा दिला नसता, तर हा रोष आणखी वाढून हे सरकार भस्मसात झाले असते. शेकडो मुले-मुली या आंदोलनात जखमी झाले. जर सरकारने खरोखरच देशाचे हित पाहिले असते, तर ज्या दिवशी पेपर फुटला त्याच दिवशी राजीनामा दिला असता."
"भाजपचा परिवार बोगस अन् करप्ट"
धर्मेंद्र प्रधान यांच्या मागे संपूर्ण भाजप परिवार उभा असल्याच्या विधानावर दानवे म्हणाले, "भाजपचा हा परिवार पूर्णपणे बोगस आणि करप्ट आहे. महिना-दोन महिन्यांत कळेल त्यांचा परिवार आहे की नाही. या सरकारने आंदोलक शेतकऱ्यांचा बळी घेतला होता, पण आता या मस्तीत आलेल्या लोकांची मस्ती देशातील तरुणाईने उतरवली आहे. यांनाही झुकवता येते, हा आत्मविश्वास आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे."
फडणवीसांच्या दिल्ली वारीवर टोला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी महाराष्ट्रातच राहणार' असे स्पष्ट केल्याबाबत विचारले असता दानवे म्हणाले, "कोणीही कपाळावर कायमचा टिळा लावून आलेले नाही की मी याच खुर्चीवर कायम राहीन. राजकारणात उद्या काहीही होऊ शकते, हे देवेंद्रजींनाही चांगले ठाऊक आहे." तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले, "तुम्ही सत्तेसाठीच गद्दारी केली. सत्तेशिवाय तुमच्याकडे काय आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वेगळा विदर्भ कधीही होऊ शकत नाही
वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की, "ज्यांचे राजकीय अस्तित्व उरलेले नाही, असे काही लोक चर्चेत येण्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. ही मागणी जनतेची नाही. वेगळा विदर्भ कधीही होऊ शकत नाही, हा मराठी माणसाचा अखंड महाराष्ट्र असाच कायम राहील."




