“तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय”; रोहित पवारांकडून विवेक भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे (प्रतिनिधी) : एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “MPSC पेपरफुटी प्रकरणात माझ्याविरुद्ध पुरावे दाखवा, मी पायउतार होईन,” असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं होतं. यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापरिवहन विभागातील त्यांच्या कार्यकाळात झालेल्या तक्रारी, घोटाळे आणि गैरव्यवहाराची माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“अन्यथा ते मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, म्हणूनच त्यांचा राजीनामा होत नाही, असा संदेश समाजात जाईल,” असंही रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान, एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आज पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. यावरून रोहित पवार यांनी विक्रम पाचपुते यांच्यावर टीका केली.
“भाजपकडून कोणीतरी आलं होतं तुमच्याशी बोलायला, त्यांची फजिती झाली,” असं म्हणत रोहित पवार यांनी विक्रम पाचपुते यांच्यावर निशाणा साधला. तसेच, चाणक्यांचा फोटो दाखवत अमित शहा यांच्यावरही रोहित पवार यांनी टीका केली. “बरेच लोक स्वतःला चाणक्य असल्याचं सांगतात, त्यांचं तरी ऐका,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला. “आम्ही लढत राहणार आहोत, तुम्ही पाठिंबा द्या. तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढू, कारण हा विषय महत्त्वाचा आहे. या माणसाचा राजीनामा व्हायला पाहिजे. सत्ताधारी आमदारांनी यावं, मी चर्चा करायला तयार आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.
तसेच, विक्रम पाचपुते यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत, “या आणि विद्यार्थ्यांसोबत बसा, आंदोलन करा. या अध्यक्षांच्या पुराव्याचा पार्ट 2 देखील येणार आहे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, “एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षपदावर तुकाराम मुंढे बसू शकतात, मी सगळं चेक केलं आहे. ज्या अटी आहेत, त्यानुसार तुकाराम मुंढे अध्यक्ष होऊ शकतात,” असं म्हणत तुकाराम मुंढे यांना एमपीएससी आयोगाचं अध्यक्षपद देण्यात यावं, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
“भीमनवार यांच्या विरोधात आधीच तक्रार गेली आहे, मग कारवाई का करत नाहीत? तक्रार केली असेल तर चौकशी करा. पण जर कारवाई झाली नाही, तर असं म्हणू शकतो की मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत, कारण ते मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत,” असं म्हणत रोहित पवार यांनी विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दरम्यान, “कुणीही कोर्टात जाऊ शकतं, PIL फाईल करावी. कोर्ट यामध्ये लक्ष घालेल. मी गेलो तर याला राजकीय वळण येईल,” असंही रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच, सध्या खासगी क्षेत्रातही नोकऱ्या उपलब्ध नाहीत, हे देखील दुर्दैवी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.




