दहीहंडीतील डान्सवर संभाजी भिडे संतापले; गौतमी पाटील, राधा पाटील यांच्या नृत्यावरून थेट निशाणा

दहीहंडीतील डान्सवर संभाजी भिडे संतापले; गौतमी पाटील, राधा पाटील यांच्या नृत्यावरून थेट निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : दहीहंडी उत्सवातील डीजे, डॉल्बी आणि महिलांच्या नृत्याच्या कार्यक्रमांवरून आता वादाला तोंड फुटलं आहे. काही दहीहंडी कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील, राधा पाटील यांच्यासह महिला कलाकारांच्या नृत्याचे कार्यक्रम झाले. यावर शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजवण्याला आपला विरोध असल्याचं संभाजी भिडे यांनी स्पष्ट केलं. दहीहंडीसारख्या धार्मिक कार्यक्रमात महिलांना नाचवणं योग्य नसल्याचं म्हणत, अशा कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली.

 डीजे आणि डॉल्बी ही महाराष्ट्राची संस्कृती नसून बाहेरची संस्कृती आपण इथे आणत असल्याचा आरोपही भिडे यांनी केला. सण-उत्सव साजरे करण्यासाठी एक ठराविक पद्धत आणि शिस्त असायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 दरम्यान, डीजे आणि मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमवरून महाराष्ट्रात आधीपासूनच वाद सुरू आहे. ध्वनीप्रदूषणामुळे नागरिक, लहान मुलं, वृद्ध आणि रुग्णांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून डीजे, डॉल्बी आणि हाय-डेसीबल साऊंडवर स्थानिक पातळीवर निर्बंधही घालण्यात आले आहेत.

 दुसरीकडे, सण-उत्सवातील संगीतावर सरसकट बंदी नको, तर नियम आणि ध्वनीमर्यादा पाळून कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी भूमिका काही आयोजकांकडून घेतली जात आहे. त्यामुळे दहीहंडी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर डीजे-डॉल्बीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.