दिशा सालियन प्रकरणी मोठा निर्णय; CBI अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश, FIR दाखल करण्याचेही निर्देश

दिशा सालियन प्रकरणी मोठा निर्णय; CBI अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश, FIR दाखल करण्याचेही निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मनोरंजन विश्वापासून राजकीय वर्तुळापर्यंत खळबळ माजवणारं दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलं आहे. दिशा सालियन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी CBI अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणी BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिच्या मृत्यूचा नव्यानं तपास करण्याची मागणी तिचे वडील सतीश सालियन यांनी केली होती. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत FIR दाखल करून प्रकरणाचा नव्यानं तपास करावा आणि हा तपास विशेषतः CBI मार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणात FIR नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना दिले असून, तपासासाठी CBI अधिकारी नियुक्त करण्याचेही आदेश दिले आहेत.

दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गोंधळही झाला होता.याच प्रकरणात नितेश राणे यांनी तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती.

दिशा सालियन ही सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करत होती. तिनं वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं होतं. दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिशाच्या शरीरावर हात, पाय आणि छातीवर जखमा असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

तसंच, दिशाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. मात्र, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला नव्या दिशेनं सुरुवात होण्याची शक्यता आहे.