नितीन गडकरींच्या डीपफेक व्हिडिओंविरोधात हायकोर्टात याचिका; मेटा, गुगलसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस

नितीन गडकरींच्या डीपफेक व्हिडिओंविरोधात हायकोर्टात याचिका; मेटा, गुगलसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डीपफेक व्हिडिओ आणि कथित बदनामीकारक डिजिटल कंटेंटविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E-20 इंधन योजनेशी संबंधित काही AI-निर्मित व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा करत त्यांनी मेटा, गुगल, एक्ससह इतर प्लॅटफॉर्मविरोधात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 5 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकल पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.गडकरी यांच्या याचिकेनुसार, सोशल मीडियावर प्रसारित होणारे काही व्हिडिओ हे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले असून, ते खोटे, दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कंटेंटमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल योजनेशी गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, E-20 इंधन योजना ही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित येते. या योजनेशी नितीन गडकरी यांचा थेट संबंध नसतानाही त्यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी गडकरी यांना या प्रकरणी दिवाणी दावा दाखल करण्याचा पर्याय असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतपणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, या याचिकेचा उद्देश सरकारच्या निर्णयांवर टीका, चर्चा किंवा विश्लेषण रोखणे नसून, केवळ खोट्या आणि बनावट डिजिटल सामग्रीविरोधात कायदेशीर संरक्षण मिळवणे हा असल्याचे गडकरी यांच्या बाजूने स्पष्ट करण्यात आले आहे.