नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा छापा; खासगी क्लास चालकावर कारवाई

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा छापा; खासगी क्लास चालकावर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) : देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा लातूरमध्ये शोधले जात आहेत. सीबीआयच्या पथकाने आज पहाटेच लातूर शहरातील सुतमील परिसरात एका खासगी ट्युशन चालकाच्या घरावर छापा टाकला असून, गेल्या अनेक तासांपासून तपासणी सुरू आहे. या कारवाईमुळे शिक्षण पंढरी मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक आज पहाटेच संबंधित ट्युशन चालकाच्या निवासस्थानी धडकले. सकाळी सहा वाजल्यापासून घराची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये संशयित ट्युशन चालकाचे मोबाईल फोन, संगणक हार्ड डिस्क आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची पडताळणी केली जात असल्याचे समजते. यापूर्वी सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर आता या ट्युशन चालकाच्या घरी पडलेल्या छाप्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत देशभरातून सात प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, पुण्यातील मनीषा वाघमारे, जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्राममधून यश यादव यांचा समावेश आहे. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आता लातूरमधील संशयितांची चौकशी केली जात आहे. तसेच, धनंजय लोखंडे याचा मित्र ओंकार शिंगोटे याची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.  

दरम्यान, 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. 21 जून रोजी नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. पेपरफुटीमुळे वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मोठे नुकसान झाले असून, शैक्षणिक वेळापत्रकही कोलमडले आहे. मात्र, सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. आता लातूरमधील या छाप्यात नेमके काय निष्पन्न होते आणि आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.