"पवनराजे हत्या प्रकरण! निर्दोष सुटकेनंतर शिंदे-फडणवीसांची अमित शाहांसोबत चर्चा; CBI उच्च न्यायालयात जाणार"

"पवनराजे हत्या प्रकरण! निर्दोष सुटकेनंतर शिंदे-फडणवीसांची अमित शाहांसोबत चर्चा; CBI उच्च न्यायालयात जाणार"

मुंबई (प्रतिनिधी) : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात तब्बल 20 वर्षांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात खटल्याचा मुख्य आधार असलेल्या माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय, विसंगत आणि संशयास्पद असल्याचे स्पष्ट नमूद केले.

या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा कायदेशीर धक्का बसल्याचे मानले जात आहे. मात्र, या प्रकरणाचा शेवट अद्याप झालेला नाही. विशेष न्यायालयाच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात CBI वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर CBI ला पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. आरोपींचे मोबाईल फोन जप्त न करणे, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) गोळा न करणे आणि आरोपींमधील कथित संपर्काचे कोणतेही ठोस पुरावे सादर न करणे या बाबींवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तपासातील या त्रुटींमुळे कटकारस्थान सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा पुरावा उपलब्ध झाला नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.निकालापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर चित्र पूर्णपणे बदलले. दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाचे स्वागत करत "सत्याचा विजय झाला" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवनराजे निंबाळकर यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर ठेवला होता. मात्र, दोन दशकांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने सर्व आठ आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले आहे.आता CBI उच्च न्यायालयात अपील दाखल करते का आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत काय घडते, याकडे राज्याच्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.