पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळा, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर
पिंपरी: भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज सोमवारी 'रेड अलर्ट' जारी केला असून अनेक भागांत मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे शहर तसेच जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहतील. शाळांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पाहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन:
मुसळधार पावसाची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदी-नाले, धबधबे आणि पाण्याचा वेग जास्त असलेल्या धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये, असे स्पष्ट करत हवामान विभाग व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.




