पुणे महापालिकेत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्तेत एन्ट्री? उपमहापौरपदासाठी संजय काकडेंची जोरदार मागणी

पुणे महापालिकेत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्तेत एन्ट्री? उपमहापौरपदासाठी संजय काकडेंची जोरदार मागणी

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या सत्तेत सहभागी होण्याचे संकेत दिले असून, त्यासाठी उपमहापौरपदाची मागणी पुढे येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी सांगितले की, राज्यात महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी हा घटक पक्ष आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतही सत्तेत सहभागी होण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. यासाठी ते सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काकडे म्हणाले की, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २२ ते २३ नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षाला उपमहापौरपद मिळणे योग्य ठरेल. ही मागणी ते सुनेत्रा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईसह इतर महापालिकांमध्ये सत्तेला पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर पुण्यातही राष्ट्रवादीला उपमहापौरपद मिळावे, अशी अपेक्षा काकडे यांनी व्यक्त केली.पुणे महापालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादीला स्थान मिळणार का आणि उपमहापौरपदाची मागणी मान्य होणार का, याकडे आता पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.