पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी TDF कडून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जाहीर

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी TDF कडून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी टीडीएफच्या वतीने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कौस्तुभ गावडे यांची अधिकृत उमेदवारी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.

यावेळी टीडीएफचे राज्य अध्यक्ष जी. के. थोरात, राज्याचे कार्यवाह के. एस. ढोमसे आणि पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजी कामथे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या प्रसंगी पुणे विभाग माध्यमिकचे प्रवक्ते प्रा. शशिकांत शिंदे, पुणे विभागाचे प्रसिद्धीप्रमुख प्रा. संतोष थोरात, राज्य कार्यकारिणी व निवड समितीचे सदस्य आणि टीडीएफचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांच्या मुलाखती पुण्यामध्ये पार पडल्या होत्या. संघटनेशी असलेली बांधीलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची सखोल जाणीव, मतदारसंघात असलेला दांडगा संपर्क आणि निवडून येण्याची क्षमता या सर्व बाबींचा विचार करून कौस्तुभ गावडे या युवा उमेदवाराची निवड करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कौस्तुभ गावडे यांनी नेहमीच पुणे विभागातील शिक्षकांच्या विविध समस्या व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मोठे संघटन व पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. टीडीएफचे माजी आमदार सुरेश पाटील व गजेंद्र ऐनापुरे यांच्यानंतर आता तिसऱ्यांदा टीडीएफच्या वतीने पुणे विभागाचे नेतृत्व करण्याची संधी गावडे यांच्या रूपाने मिळत असल्याने त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

टीडीएफच्या या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पूर्ण ताकदीने उभे राहावे आणि प्रचंड बहुमताने टीडीएफचा उमेदवार निवडून आणावा, असे आवाहन टीडीएफचे राज्य अध्यक्ष जी. के. थोरात यांनी केले आहे.