पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर संताप

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर संताप

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेलं पुणे शहर गेल्या काही महिन्यांपासून पेपरफुटीचं केंद्र बनल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे. नीट पेपरफुटीचं थेट कनेक्शन पुण्यात आढळून आलं, तर सीईटी परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलं. त्यानंतर आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यातील पेपरफुटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यातच पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने पेपरफुटी आणि आर्थिक अडचणींमुळे जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रथमेश देशमुख असं या तरुणाचं नाव असून, तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी होता. प्रथमेशवर अडीच लाख रुपयांचं कर्ज होतं. या आर्थिक अडचणींतून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, प्रथमेशने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये पेपरफुटीच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ आणि अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका करत एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पेपरफुटीच्या प्रश्नावर सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मोर्चात काँग्रेस पक्ष सक्रिय होता. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा घ्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास, एमपीएससी अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत आणि त्यांनीच त्यांची नियुक्ती केली होती, असा अर्थ निघेल, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्र सरकार आंधळं आणि बहिरं आहे. धाराशिवमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली, हा सरकारने घेतलेला बळी आहे. त्यामुळे प्रथमेशच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे,” असा आरोप सपकाळ यांनी केला. प्रथमेशच्या आत्महत्येनंतर तरी आता अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, अभिजीत दिपके यांनी प्रथमेशच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलं.

 “कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. सरकारसाठी तुमचा जीव महत्त्वाचा नसेल, पण तुमच्या कुटुंबीयांसाठी तो अत्यंत मोलाचा आहे,” असं आवाहन अभिजीत दिपके यांनी केलं. ग्रामीण भागातून पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.