फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात : कृष्णराज महाडिक
मुंबई (प्रतिनिधी) : भाजप युवा मोर्चात काम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की, आपण भाग्यवंत आहोत, आपल्याला भाजपचं काम करायला मिळत आहे. हा आपल्यासाठी सुवर्णकाळ आहे. आपलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. साहेब तुम्ही फक्त माझे नेते आणि गुरु नाहीत तर तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, असे वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवाशक्ती जागर यात्रा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोंडभरुन स्तुती केली. देवेंद्र फडणवीस साहेब मी तुमच्याकडे बघून इतक्या गोष्टी शिकतोय. मला खात्री आहे की, मी तुमच्या सानिध्यात वाढलो तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती मला थांबवू शकत नाही. महाराष्ट्रातील युवा मोर्चाला देशातील पहिल्या क्रमांकाचा युवा मोर्चा बनवणे, हे माझे लक्ष्य आहे, असे कृष्णराज महाडिक यांनी म्हटले.

यावेळी कृष्णराज महाडिक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही आभार मानले. आज ही युवकांची सभा आहे. मात्र, इथे बसलेल्यांपैकी मनाने सर्वात कोण तरुण असेल तर ते म्हणजे रवींद्र चव्हाण आहेत. गेल्या दीड महिन्यांत तुम्ही माझ्यावर मुलासारखं प्रेम केलंत. मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द देतो, असे कृष्णराज महाडिक यांनी म्हटले. यावेळी कृष्णराज महाडिक यांनी आपल्या विरोधकांनाही इशारा दिला. तरुण वयात माझ्या प्रगतीमुळे तुम्हाला त्रास होत आहे. परंतु, माझा विरोध कितपत करायचा याचा विचार करा. येणाऱ्या काळात मी माझ्या राजकीय शिखरावर असेन तेव्हा मी भाजपचं सगळ्यात ताकदीचं शस्त्र असेन. त्याच्यासमोर उभं राहण्याचं तुमचं धाडस होणार नाही, असे कृष्णराज महाडिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
कुरुक्षेत्रावरील युद्धात कौरव आणि पांडव दोन बाजू होत्या. युद्धापूर्वी पांडवाकडून अर्जून आणि कौरवांकडून दुर्योधन हे दोघे कृष्णाला भेटायला गेले. तेव्हा कृष्णाने सांगितले मी हे युद्ध नि:शस्त्र लढणार. एकतर तुम्ही माझी सेना घेऊ शकता किंवा मला घेऊ शकता. तेव्हा दुर्योधनाने विचार न करता सांगितले की, मी तुमची सेना घेईन. तर अर्जून विचार न करता कृष्णाला म्हणाला की, मला तू पाहिजे. यावर दुर्योधन अर्जुनावर हसला. नि:शस्त्र कृष्णाचा तुला काय उपयोग, असा सवाल त्याने अर्जूनाला विचारला. त्यानंतर कृष्णाने अर्जूनाला विचारले की, मी तुमच्यासाठी काय करु? तेव्हा अर्जूनाने कृष्णाला आपला सारथी होण्यास सांगितले.
कुरुक्षेत्रावर अर्जून युद्धाला उभा राहिला तेव्हा त्याच्यासमोर त्याचे गुरु, पितामह भीष्म आणि परिवारातील सदस्य होते. तेव्हा अर्जूनाने धनुष्य खाली ठेवले. तेव्हा कृष्णाने अर्जूनाला जबाबदारीची आठवण करुन दिली. अखेर युद्धात अर्जून आणि पांडव विजयी झाले. अर्जून सगळ्यात मोठा योद्धा आहे, असे सगळे म्हणत होते. पण कृष्णाशिवाय जिंकणे शक्य नव्हते हे त्याला माहिती होते. मी एवढ्यासाठी इथे बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय की, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातील मी सारथी बनायला तयार आहे. तुम्हाला सर्वांना दिशा दाखवेन, मार्ग काढून दाखवेन,प्रामाणिक मित्र बनून राहीन, असे कृष्णराज महाडिक यांनी म्हटले.




