बदलापूर प्रकरणातील चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे; दहावीपर्यंत शुल्क भरणार शासन
मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यासह देशात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणातील पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता सरकार उचलणार आहे. विशेष बाब म्हणून दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्काला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आहे. ऑगस्ट 2024 मधील बदलापूर शाळा अत्याचार प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. यातील आरोपी अटकेत गेल्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी मदतीची घोषणा केली होती. मात्र, शासनाकडून फी भरली जात नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी सोशल मीडियावर केला होता. त्यानंतर आता अखेर प्रशासन जागे झाले असून वडिलांच्या इच्छेनुसार त्याच्या आवडीच्या शाळेत दोन्ही मुलींचा प्रवेश केला जाणार आहे. तसेच आता प्रवेश शुल्क आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासन थेट शाळांना देणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुल्क वेळेत मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. निर्भया क्र. 1 चे पहिली ते दहावीपर्यंतचे शुल्क शासन भरणार आहे. तर निर्भया 2 चे सीनिअर केजी ते दहावीपर्यंतचे सर्व शुल्क शासनाकडून अदा होणार आहे. RTE अंतर्गत थेट शाळांना निधी देण्यात येणार असून मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, हा शासनाचा उद्देश असल्याचे बोललं जात आहे.
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट 2024 रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर 13 ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला. नंतर या प्रकरणी लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. त्यावेळी संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली.




