मनोज जरांगेंची शिंदेंवरील ‘ती’ कृती मराठा समाजाला रुचली नाही; शंभूराज देसाई म्हणाले, “यापुढे असं करू नका…”

मनोज जरांगेंची शिंदेंवरील ‘ती’ कृती मराठा समाजाला रुचली नाही; शंभूराज देसाई म्हणाले, “यापुढे असं करू नका…”

मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका आणि एकेरी उल्लेख मराठा समाजाला फारसा रुचलेला नाही. मनोज जरांगेंनी यापुढे अशी भाषा वापरू नये, अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. मनोज जरांगे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारने कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आतापर्यंत साडेतीन लाख ते पावणे चार लाख लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

 तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठीच्या निधीची मर्यादा १ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. वसतिगृह आणि परदेशी शिक्षणासाठीच्या सवलतींबाबत दिलेली आश्वासनंही सरकारने पूर्ण केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंविषयी एकेरी भाषा वापरली, हे मराठा समाजातील कोणालाही रुचलेलं नाही. आम्ही शिंदे साहेबांचे समर्थक आहोत, त्यामुळे आम्हालाही ही भाषा रुचलेली नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले.

 गेल्या दोन दिवसांत मराठा समाजातील अनेक तरुणांचे फोन आणि मेसेज आले. एकनाथ शिंदेंवर एकेरी टीका केल्यामुळे मराठा आंदोलनाला राजकीय वळण लागणं योग्य नाही, अशी भावना या तरुणांनी व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं.“आम्ही अजूनही मनोज जरांगेंचा उल्लेख दादा म्हणून करतो. मात्र ते एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करतात. राजकारणात २०२२ मध्ये जे घडलं, त्याचा नको तसा उल्लेख केला जातो. २०२१ मध्ये मराठा आंदोलन सुरू झालं, तेव्हा त्याची जी गंभीरता होती, त्याची दिशा आता वेगळी होत असल्याचं सामान्य माणसांना वाटत आहे,” असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.

 मनोज जरांगे यांना सरकारने जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करण्याचे प्रयत्न आजही सुरू आहेत. मात्र शिंदे साहेबांवर केलेली टीका सामान्य मराठा समाजाला रुचलेली नाही. त्यामुळे जरांगेंनी यापुढे अशी टीका करू नये, अशी विनंती शंभूराज देसाई यांनी केली. मनोज जरांगे अंतरवालीतून चर्चेसाठी दुसरीकडे येत नसतील, तर ते ठीक आहे. मात्र त्यांचं प्रतिनिधी मंडळ आणि अभ्यासक मंडळ आमच्याशी कधीही चर्चा करू शकतं. आम्ही चर्चेसाठी खुले आहोत आणि मनोज जरांगेंचा आम्ही आदर करतो.

 पण त्यांनी वारंवार एकनाथ शिंदेंविषयी एकेरी भाषेत बोलणं सुरू ठेवलं, तर ते कोणालाही रुचणार नाही, असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.