मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात; कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं, प्रकृती स्थिर
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील एका कार्यकर्त्याचा अपघात झाल्याची घटना घडली. कडेगावहून विटाकडे येत असताना जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील कारला बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एका कार्यकर्त्याच्या पाठीला मार लागला आहे.

या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः बसलेल्या डिफेंडर गाडीतून जखमी कार्यकर्त्याला आधी विटा येथील सरकारी रुग्णालयात नेलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार्यकर्त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याची खात्री करून मनोज जरांगे पाटील पुन्हा विटामधील नेवरी नाका येथे स्वागतासाठी रवाना झाले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी दौरा सुरू केला असून आज त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप होत आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे पाटील यांचं भव्य पद्धतीने स्वागत करण्यात आलं. या स्वागतासाठी ढोल-ताशा, झांज पथकासह 30 जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलं.
दरम्यान, स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे त्यांच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना बसने धडक दिली. या धडकेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली.जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील किरण भगत या कार्यकर्त्याच्या कारला बसची धडक बसली. या धडकेत त्याला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सांगलीतील विटा शहराकडे येत असताना आंबेगावजवळ जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती.
अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः आपल्या डिफेंडर कारमधून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या जखमी कार्यकर्त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.दरम्यान, आपल्याकडे असलेल्या डिफेंडर कारबाबत मनोज जरांगे पाटील यांनी याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे. ते मंगळवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, ही डिफेंडर गाडी माझी नाही आणि माझ्याकडे एक रुपयाही नाही.
एका कार्यकर्त्याने, ज्याचं नाव मला माहिती नाही, त्याने ही डिफेंडर कार मला वापरायला दिली आहे. त्याने मला सांगितलं की, मला देवाने भरपूर दिलं आहे. पाटील, तुम्ही माझ्या गाडीत बसा, असं तो म्हणाला. त्यामुळे मी ही गाडी घेऊन दौऱ्यावर आलो, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मराठा समाजातील लोक मला त्यांच्या गाडीत बसवतात. प्रत्येक जातीत श्रीमंत वर्ग आहे. हे लोक दुसऱ्याला काहीही न विचारता मदत करतात. माझा समाज म्हणतो, बसा गाडीत, मी बसतो. माझा समाज माझ्यावर जीव लावतो, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.या डिफेंडर गाडीच्या काचा फुटल्या आहेत. 50-50 पोरं त्या गाडीला लटकतात, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.




