महायुतीला पराभवाचा धक्का देणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी देवेंद्र फडणवीस अचानक पोहोचले; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री विधान परिषद आमदार गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेचे सहयोगी सदस्य झालेल्या गोकुळ गिते यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत गणेश गिते आणि गोकुळ गिते या गिते बंधूंनी चांगलाच रंग भरला होता. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या गणेश गिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या शब्दाचा मान राखत निवडणुकीतून माघार घेतली होती.
विधान परिषद निवडणुकीच्या काळात गिते बंधूंच्या भूमिकेकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलं होतं. गणेश गिते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही गोकुळ गिते यांच्या भूमिकेबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. गोकुळ गिते यांनीही शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचा प्रचार करणार नाही, असा दावा केला होता. मात्र, सरतेशेवटी गोकुळ गिते यांनी महायुतीने प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला. या निकालामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर गोकुळ गिते हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले.
विधान परिषद निवडणुकीच्या काळात रंगलेल्या माघारीच्या नाट्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला आल्यानंतर गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिते यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे.मुख्यमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान गिते कुटुंबीयांकडून रक्षाबंधनाचा सणही साजरा करण्यात आला. आमदार गोकुळ गिते आणि गणेश गिते यांच्या पत्नी आणि भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. त्यामुळे राजकीय भेटीसोबतच या भेटीला कौटुंबिक आणि भावनिक स्वरूपही प्राप्त झालं.
मात्र, दोन महिन्यांपूर्वीच महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेचे सहयोगी सदस्य झालेल्या गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या काळात गिते बंधूंच्या भूमिकेमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली होती. विशेषतः गणेश गिते यांनी घेतलेली माघार, गोकुळ गिते यांची भूमिका आणि त्यानंतर महायुतीच्या उमेदवाराचा झालेला पराभव या सर्व घडामोडी महत्त्वाच्या ठरल्या होत्या.आता त्याच गोकुळ गिते यांच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस पोहोचल्याने या भेटीमागचा राजकीय संदेश काय, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.




