महाराष्ट्राचे केंद्राकडे 3 हजार कोटी अडकले! मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य; ठेकेदारांचे पैसे कधी मिळणार?
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारकडे रोजगार हमी योजनेच्या बिलाचे राज्याचे तब्बल 3 हजार कोटी रुपये अडकले असल्याचं त्यांनी सांगितलं. हे पैसे मिळाल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेली ठेकेदारांची बिले दिली जातील, असंही गोगावले यांनी स्पष्ट केलं.आज भरत गोगावले पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोजगार हमी योजनेतील अनेक ठेकेदारांची बिले रखडल्याबाबत विचारलं असता त्यांनी केंद्राकडे राज्याचे 3 हजार कोटी रुपये अडकले असल्याचं सांगितलं.

“केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे महाराष्ट्राला मिळणाऱ्या 3 हजार कोटी रुपयांची रक्कम आहे. याबाबत जास्तीत जास्त रकमेची मागणी करण्यात आली आहे. हे पैसे मिळाल्यानंतर थकीत बिले दिली जातील,” असं भरत गोगावले यांनी सांगितलं.दरम्यान, शरद पवारांनी पूर्वीच मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, या विखे पाटील यांच्या विधानावर गोगावले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “जुन्या काळात अटी-शर्ती फारशा नव्हत्या. त्यावेळी निर्णय घेतला असता तर समाजाला त्याचा फायदा झाला असता, असं विखे पाटील यांना वाटलं असेल. पवारांनी करायला हवं होतं,” असं ते म्हणाले.
मनोज जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना गोगावले म्हणाले की, “वैयक्तिक विचाराला औषध नसतं. मात्र कितीही टीका झाली तरी शिंदे साहेब संयमी आहेत.” मनोज जरांगे यांनी दिलेल्या 11 सप्टेंबरच्या अल्टिमेटमबाबत बोलताना गोगावले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणालाही अडचण होणार नाही, याचाही विचार करावा लागेल. सर्व बाबींचा अभ्यास करून पुढे जावं लागेल. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात डॉल्बी बंदीवरून सुरू असलेल्या वादावरही गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. शासनाने याबाबत योग्य निर्णय घेतला असून इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कमी आवाजात डॉल्बी लावल्यास इतरांना त्रास होत नाही, मात्र पारंपरिक वाद्यांचा वापर करणं योग्य असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं.




