मिसिंग लिंक प्रकल्पावर पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर गंभीर आरोप; 40% कमिशनमुळे सुरक्षेशी तडजोड?

मिसिंग लिंक प्रकल्पावर पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर गंभीर आरोप; 40% कमिशनमुळे सुरक्षेशी तडजोड?

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पावसाळ्यात मिसिंग लिंकवर पडलेले खड्डे आणि दरड कोसळण्याच्या घटना पाहता सुरक्षेबाबत तडजोड झाल्याचा संशय निर्माण होतो. इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पात गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरड कोसळण्यामागे बदललेले हवामान आणि अभूतपूर्व पावसाला कारणीभूत ठरवलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, हवामानातील बदलांचा अभ्यास करूनच अशा प्रकल्पांची आखणी झाली पाहिजे. हा अभ्यास झाला नसेल, तर ती गंभीर बाब आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प आपणच रोखला होता, हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. उलट, या प्रकल्पाची संकल्पना आमच्याच सरकारची होती, असे सांगत त्यांनी 2013 मध्ये प्रकल्पाला कायमस्वरूपी नकार दिला नव्हता, तर सुरक्षा, खर्च आणि तांत्रिक बाबींचा पुनर्विचार करण्यासाठी स्थगिती दिली होती, असे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चावरही प्रश्न उपस्थित केले. प्रकल्पाची किंमत जवळपास 50 टक्क्यांनी कशी वाढली, याची चौकशी व्हायला हवी. तसेच महायुती सरकारच्या काळात कंत्राटांमध्ये 40 टक्के कमिशनची चर्चा होत असल्याचा उल्लेख करत, मिसिंग लिंक प्रकल्पातही भ्रष्टाचार झाला का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.तसेच भविष्यात संधी मिळाल्यास या प्रकल्पाचे कॅगमार्फत ऑडिट करण्यात येईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.