राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली; ‘वर्षा’वर दोघांमध्ये खलबतं, भेटीचं कारणही समोर
मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान कोकणातील रस्त्यांसह शिवाजी पार्क मैदानाच्या विषयावरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 9 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी रायगडमधील माणगाव बायपासजवळ जाऊन मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती.

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, स्थानिक राजकीय हस्तक्षेप आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. कामापेक्षा आपल्याला टक्के कसे मिळतील याचाच विचार केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला होता.यानंतर आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील रस्ते आणि इतर विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
गेली 17 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असून, त्याचा कोकणवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये माणगाव बायपासचे रखडलेले काम मोठा अडसर ठरत आहे. याच कामाची राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती.त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप केला होता.
“आमच्या जमिनी, आमचं पाणी आणि यावर बाहेरचे लोक पोसले जाणार आहेत. कोकणात आपल्या पायाखालच्या जमिनी खेचल्या जातायत आणि त्यामुळे असं वाटतंय की आता विकासच नको,” असं राज ठाकरे म्हणाले होते.“15 वर्षांपासून तीच गोष्ट सुरू आहे. तेच खड्डे, तोच ट्रॅफिक जाम... आपल्याकडे निवडणुकीत तेच तेच विषय असतात. नोकरी, पाणी, रस्ते...” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
तसंच, सगळे आमदार एकत्र आले असते तर मुंबई-गोवा महामार्गासाठी इतकी वर्षे लागली नसती, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.आता या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि पुढे या मुद्द्यांवर सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




