राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम; 'एकत्र येण्याचा प्रश्नच नाही
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर अखेर शरद पवार यांनी स्वतःच स्पष्ट भूमिका मांडली आहे. बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट सांगितले.

अलीकडे दिल्लीत प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला होता. त्याआधी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याने विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते.
दरम्यान, काही वृत्तांमध्ये भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतरच एनडीएमध्ये प्रवेशाचा पर्याय असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यानंतर या सर्व चर्चांना मोठा धक्का बसला आहे.याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनीही पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी घेतली होती, त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये.
रोहित पवार म्हणाले, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्या पक्षातील बहुतांश आमदार-खासदार लढण्यासाठी तयार आहेत. मीही पक्षाच्या विचारांसोबत ठामपणे उभा राहणार असून, एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.शरद पवार आणि रोहित पवार यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे.




