रोहित पवारांनी MPSC अध्यक्षांविरोधातील तक्रारींचे कागदपत्रे दाखवले; ‘हा फक्त ट्रेलर, राजीनामा द्या’

रोहित पवारांनी MPSC अध्यक्षांविरोधातील तक्रारींचे कागदपत्रे दाखवले; ‘हा फक्त ट्रेलर, राजीनामा द्या’

मुंबई (प्रतिनिधी) : MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर भीमनवार यांनी माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला, तरी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देईन, असं म्हटलं होतं.

आता आमदार रोहित पवार यांनी भीमनवार यांच्याविरोधात यापूर्वी करण्यात आलेल्या काही तक्रारींची कागदपत्रे समोर आणली आहेत. परिवहन आयुक्त असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचा दावा करत, या तक्रारी आणि पुरावे पाहा, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 MPSC अध्यक्षपद हे संवैधानिक आणि अत्यंत महत्त्वाचं पद आहे. त्यामुळे या पदावर असलेल्या व्यक्तीने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली. ‘हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर लवकरच दाखवतो,’ असं म्हणत रोहित पवारांनी बदल्या, पदोन्नती, ओव्हरलोड वाहनांच्या याद्या आणि वरळी वाहनखरेदी प्रकरणातील चौकशीचा उल्लेख केला आहे.

 दरम्यान, परिवहन आयुक्त असताना वाहन खरेदी प्रक्रियेत एका विशिष्ट कंपनीला फायदा मिळवून दिल्याचा आरोप करणारी तक्रार एका RTO अधिकाऱ्याने केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. या प्रकरणातील कागदपत्रेही त्यांनी सार्वजनिक केली आहेत.

 मात्र, या सर्व आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा अंतिम निष्कर्ष समोर येणे बाकी आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आता MPSC अध्यक्ष या आरोपांना काय उत्तर देतात आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार काय निर्णय घेतं, याकडे विद्यार्थ्यांचं आणि राज्याचं लक्ष लागलं आहे.