लग्नाच्या 12व्या दिवशी तलाठ्याने संपवलं जीवन; डायरीतून उघड झाला धक्कादायक खुलासा

लग्नाच्या 12व्या दिवशी तलाठ्याने संपवलं जीवन; डायरीतून उघड झाला धक्कादायक खुलासा

बीड (प्रतिनिधी) : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.आता या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीत लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र पत्नीचे वागणे बदलले. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेश सोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली. गणेश २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.

गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला.गणेशची पत्नी ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. नवविवाहानंतर इतक्या कमी कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गणेश कोळी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.