वरळीत नवा राजकीय ट्विस्ट! सचिन अहिर शिंदे शिवसेनेत; आदित्य ठाकरेंसमोर 2029 चं मोठं आव्हान?
मुंबई (प्रतिनिधी) : सचिन अहिर यांनी ३० जून रोजी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबईतील वरळी मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून वरळीत ठाकरे गटाची ताकद वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सचिन अहिर आता विरोधी गटात गेल्याने २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर वरळीतील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्याच काळात आदित्य ठाकरे यांनी वरळीतून पहिली विधानसभा निवडणूक लढवत सुमारे ६७ हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
मात्र, २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेकडे स्थानिक चेहरा नसल्याने त्यांनी मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा विजय झाला असला, तरी त्यांचे मताधिक्य अवघ्या ८,८०१ मतांवर आले. त्यामुळे वरळीतील लढत पूर्वीपेक्षा अधिक चुरशीची झाल्याचे चित्र दिसून आले.
आता सचिन अहिर हेच शिंदे शिवसेनेत दाखल झाल्याने वरळीत शिंदे गटाला स्थानिक आणि अनुभवी नेतृत्व मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटातील फुट, काही प्रमुख नेत्यांचे पक्षांतर आणि बदललेले राजकीय समीकरण यामुळे वरळी हा मतदारसंघ आगामी काळात अधिक चर्चेत राहू शकतो.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. "सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं? त्यांच्या भावाला बीएमसीमध्ये संधी दिली, मुलीला प्रभाग समितीत जबाबदारी दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. जवळचे आणि ज्यांना सर्वाधिक मिळतं, तेच पक्ष सोडून जातात. मात्र कुणाच्या जाण्याने आमच्या पक्षाला धक्का बसत नाही," असे ते म्हणाले.
यासोबतच, "वरळी आणि शिवडी हे आमचे बालेकिल्ले आहेत. तिथे केलेलं कामच आमच्यासाठी बोलेल. सचिन अहिर वरळीतून उमेदवार असले तरी त्याचा काही फरक पडणार नाही," असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.राज्यात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. जे लोक पक्ष सोडून गेले, ते आज कोणासोबत उभे आहेत, हा खरा प्रश्न आहे."
सचिन अहिर यांच्या नव्या राजकीय वाटचालीमुळे वरळीतील आगामी निवडणुकीची उत्सुकता निश्चितच वाढली असून, २०२९ पर्यंत या मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.




