विलिनीकरणाला नकार, पण मोदींना बारामतीचे निमंत्रण; शरद पवारांच्या भूमिकेची राजकीय चर्चा
पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला असतानाच, दुसरीकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीला येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येत असलेल्या ९ फूट उंच गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा ठराव संस्थेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी २ ऑक्टोबर किंवा १६ ऑक्टोबर या दोन तारखांपैकी एक तारीख निश्चित होण्याची शक्यता असून, अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून अपेक्षित आहे.
या ठिकाणी गौतम बुद्धांच्या पुतळ्यासह महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांसह १३ महामानवांची चित्रेही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. शरद पवार यांनी स्वतः या प्रकल्पाची पाहणी केली असून, कार्यक्रमाची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना फेटाळून लावत, "दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रश्नच नाही," असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
अलीकडेच शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने विविध राजकीय तर्कवितर्क रंगले होते. मात्र, विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी केलेल्या स्पष्ट वक्तव्यानंतर त्या चर्चांना सध्या तरी विराम मिळाल्याचे चित्र आहे.
एकीकडे विलिनीकरणाचा इन्कार आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदींना बारामतीतील कार्यक्रमासाठी निमंत्रण, या दोन घडामोडींमुळे शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




