शहरात झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच ; राजारामपुरीत एकाच दिवशी ४ झाडे कोसळली, नागरिक संतप्त

शहरात झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच ; राजारामपुरीत एकाच दिवशी ४ झाडे कोसळली, नागरिक संतप्त

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात झाडे कोसळत आहेत. कोल्हापूर महापालिका प्रशासन अखेर कधी जागे होणार? शहरात एकापाठोपाठ एक झाडे कोसळण्याचे सत्र रूच असून, पालिका प्रशासन मात्र नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहतंय का? असा संतप्त सवाल आता कोल्हापूरकर विचारत आहेत. झाड कोसळून जीवितहानी नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

आज पुन्हा राजारामपुरी परिसरातील १४ वी गल्ली, ८ वी गल्ली, ५ वी गल्ली आणि ६ व्या गल्लीत तब्बल चार झाडे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी ताराबाई पार्क आणि दोन दिवसांपूर्वी उद्योग भवन परिसरातील झाड कोसळण्याच्या स्थितीत होते. मात्र नगरसेविका दीपाली घाटगे यांनी तत्परता दाखवत झाडाच्या फांद्या तत्काळ हटवून घेतल्या. काल राजारामपुरी ५ वी गल्ली याठिकाणी झाड पडले होते. यावेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.

पावसाळ्यापूर्वीच शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आवश्यक होते. मात्र, पालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. शहरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एखादा मोठा अनर्थ घडल्यावर किंवा निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का? असा सवाल जनतेतून केला जात आहे.