सचिन अहिर शिंदे गटात; अब्दुल सत्तारांनी केला धक्कादायक खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

या घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मोठा दावा केला आहे. सत्तार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर अनेक नेत्यांचा विश्वास आहे आणि सचिन अहिर हे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा केवळ मुंबईसाठी नसून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.याचवेळी सत्तारांनी आणखी एक खळबळजनक दावा करत म्हटले की, खासदारांच्या बंडाच्या काळात सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी नव्हे, तर एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीनुसार काम करत होते. त्या कामाची दखल घेत त्यांना उपसभापतीपदाची संधी देण्यात आली असावी, असा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले. "अजून पिक्चर बाकी आहे. भविष्यात आणखी आमदार आमच्यासोबत येऊ शकतात. संख्या १२ च्या पुढे गेल्यानंतर त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला दिसतील,"असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




