39 कोटींचं कलादालन थेट 160 कोटींवर? लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून सरनाईक-महेतांमध्ये जुंपली, आरोप-प्रत्यारोपांना धार
मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून आता मिरा-भाईंदरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नाट्यगृहातील सुविधा बंद असल्याचा आरोप करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली होती. आता त्यांच्या या आरोपांना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, आरोप सिद्ध करण्याचं थेट आव्हान सरनाईक यांना दिलं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या वाढलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“39 कोटी रुपयांचं कलादालन तब्बल 160 कोटी रुपयांवर कसं गेलं?” असा थेट सवाल नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला आहे. सुमारे 40 हजार चौरस फुटांच्या कलादालनासाठी एवढा मोठा खर्च कसा झाला, याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरदार पलटवार केला आहे.
नरेंद्र मेहता यांच्या आरोपानुसार, मिरा-भाईंदर महानगरपालिकेने या कलादालनासाठी सुरुवातीला सुमारे 39 कोटी रुपयांची निविदा काढली होती. मात्र, प्रकल्पाचा खर्च वाढत-वाढत तब्बल 160 कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. “एवढ्या रकमेत कलादालनावर चांदीचे पत्रे लावले असते, तरी एवढा खर्च झाला नसता,” अशा बोचऱ्या शब्दांत मेहता यांनी प्रकल्पाच्या खर्चावरून निशाणा साधला.
यावेळी नरेंद्र मेहता यांनी आणखी गंभीर आरोप करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर हा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून एक दिवसापूर्वी मंत्री प्रताप सरनाईक यांनी महानगरपालिका प्रशासन आणि भाजपच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर आता नरेंद्र मेहता यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या खर्चाचा मुद्दा पुढे करत सरनाईक यांच्यावर पलटवार केला आहे.
नाट्यगृहाच्या दुरवस्थेवरून सुरू झालेला हा राजकीय सामना आता थेट 160 कोटींच्या कलादालनापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमध्ये सरनाईक विरुद्ध मेहता असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे.दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी केलेले आरोप गंभीर असले, तरी या आरोपांवर मंत्री प्रताप सरनाईक तसेच संबंधित प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे मेहतांच्या आरोपांना सरनाईक काय प्रत्युत्तर देतात आणि कलादालनाच्या वाढलेल्या खर्चाबाबत प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं, याकडे आता मिरा-भाईंदरच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.




