MPSC औषध निरीक्षक भरतीवर मोठे आरोप! रोहित पवारांचा दावा, पेपरसेटरनेच दोन दिवस आधी प्रश्नपत्रिका दिली
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला की, संपूर्ण MPSC प्रणाली हॅक झाली नव्हती, मात्र प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीकडूनच पेपर लीक करण्यात आला.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रश्नपत्रिका पुरवण्यात आली. व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्न पाठवून काही मिनिटांत ते संदेश डिलीट केले जात होते. मात्र, एका विद्यार्थ्याने पुरावा म्हणून ते प्रश्न मित्राला फॉरवर्ड केल्याने तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आणि परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेले प्रश्न दाखवत दोन्हीतील साम्य असल्याचा आरोप केला.
यासोबतच त्यांनी गेल्या काही वर्षांत TET, NEET, तलाठी, SRPF, जलसंधारण, महाजेनको यांसह विविध भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित पेपरफुटीचाही उल्लेख केला आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली.
या प्रकरणी MPSC अधिकाऱ्यांची भेट घेणार असून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही निवेदन देणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, या आरोपांवर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका येणे अद्याप बाकी आहे.




