NEET पेपरफोड्यांची शक्कल! ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव, ‘कैलाश-शिवालिक’ कोड
मुंबई (प्रतिनिधी) : NEET 2026 परीक्षा घोटाळ्यात आरोपींनी आपली ओळख आणि बेकायदेशीर कारवाया लपवण्यासाठी सांकेतिक नावं म्हणजेच कोड नेम्स आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सचा वापर केल्याचं तपासात समोर आलं आहे. NTA च्या मास्टर सेटसाठी म्हणजेच मूळ प्रश्नपत्रिकेच्या प्रतींसाठी “कैलाश” आणि “शिवालिक” ही सांकेतिक नावं वापरण्यात आली होती.

संशय टाळण्यासाठी एका व्हॉट्सॲप ग्रुपला “NEET 2026”, तर दुसऱ्या ग्रुपला चक्क “FIFA World Cup 2026” असं नाव देण्यात आलं होतं. पुण्याच्या मनीषा मांढरे हिने नोव्हेंबर 2025 मध्ये आठ विद्यार्थ्यांसह बायोलॉजी क्लासेसचं वेळापत्रक आणि माहिती शेअर करण्याच्या बहाण्याने हा ग्रुप तयार केला होता. याशिवाय आरोपींनी एकमेकांचे मोबाईल नंबरही “AP Broker” आणि “Shubham Maharashtra” अशा नावांनी सेव्ह केले होते.
या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचंही तपासात उघड झालं आहे. एका उमेदवाराकडे 4 लाख रुपये, तर दुसऱ्या एका प्रकरणात तब्बल 21 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. आरोपी यश यादव याने गॅरंटी म्हणून विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची मूळ प्रमाणपत्रं आणि सह्या केलेले कोरे चेक ताब्यात घेतले होते.
गुरुग्राममधील यश यादवच्या घरातून लीक झालेल्या प्रश्नांचे प्रिंटआउट जप्त करण्यात आले आहेत. त्याने उमेदवारांच्या राहण्याची आणि अभ्यासाच्या साहित्याचीही व्यवस्था केल्याचं तपासात समोर आलं आहे. वाघमारेंच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये “NEET 2026” हा ग्रुप आढळला. तर इतर मोबाईल आणि पेनड्राइव्हमधून PDF आणि फोटोही हस्तगत करण्यात आले.
विशेष म्हणजे, हस्तलिखित वह्यांमधील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेच्या पेपरशी जुळल्याचं फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झालं आहे. CFSL आणि GEQD च्या सरकारी हस्तलेखन तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत याला दुजोरा मिळाला आहे.
या संपूर्ण सिंडिकेटविरोधात भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि Public Examinations (Prevention of Unfair Means) Act अंतर्गत गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे.




