PM मोदींच्या आवाहनानंतर सोन्याचे दर घसरले की वाढले? पाहा आजचे ताजे दर
मुंबई (प्रतिनिधी) : देशात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना “एक वर्ष सोने खरेदी टाळा” असे आवाहन केल्यानंतर आज सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे.

रविवारी हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची परकीय चलन बचत करण्यासाठी नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पेट्रोल-डिझेलचा संयमित वापर, अनावश्यक परदेश प्रवास टाळणे, खाद्यतेलाचा कमी वापर आणि एक वर्ष सोने खरेदी न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. अमेरिका-इराण तणाव, मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थिती आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार आर्थिक परिणामांशी सामना करत असल्याचे मानले जात आहे.
आज 11 मे 2026 रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात सौम्य घसरण दिसून आली. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,500 रुपये असून 250 रुपयांची घसरण झाली आहे. मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,52,350 रुपये आहे. चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात सर्वाधिक 300 रुपयांची घसरण झाली असून दर 1,54,370 रुपये आहे. जळगाव सराफ बाजारातही सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली. आज सोन्याचा दर 1,50,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असून परवाच्या तुलनेत 300 रुपयांनी कमी झाला आहे.




