अजित पवारांच्या विमान अपघातावर आता मी अधिक बोलणार नाही; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

अजित पवारांच्या विमान अपघातावर आता मी अधिक बोलणार नाही; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील वादावर आता पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकरणावर यापुढे आपण कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ( सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना घेतली.

 सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सरकारने एफआयआर दाखल केल्याबद्दल आणि सत्ताधारी आमदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया देत, वारंवार अशा गोष्टींमुळे 'मीडिया ट्रायल' होत असल्याची शंका व्यक्त केली होती. सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्याबाबत आज पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. "माझी हात जोडून विनंती आहे, या विषयावर मी आजपासून बोलणे बंद केले आहे," असे सांगत त्यांनी या वादाला पूर्ण विराम दिला.

 सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया काय होती?

यापूर्वी बोलताना सुनेत्रा पवार यांनी, "आमच्यावर मोठा आघात झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी घेतल्या असून तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. वारंवार अशा मुद्यांवर बोलल्याने मीडिया ट्रायल होते," अशी खंत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनीही यापुढे या विषयावर बोलण्याचा निर्णय घेतला आहे.