अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; 12 लाखांचे व्हेंटिलेटर 22.50 लाखांत खरेदी? सुनील देशमुखांचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालकांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणावर बोट ठेवत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे. अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 20 व्हेंटिलेटर तब्बल दामदुपटीने खरेदी करण्यात आल्याचा दावा डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, 12 लाख रुपयांचे व्हेंटिलेटर 22 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे सुनील देशमुख यांनी केला आहे. हॅमिल्टन C-3 कंपनीचे 20 व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले असून, हे वाशीम येथील निर्मल एजन्सीकडून 22 लाख 51 हजार रुपयांना खरेदी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.ज्या पत्त्यावर निर्मल एजन्सीचा पत्ता देण्यात आला आहे, त्या ठिकाणी सध्या किराणा, मिरची पावडर आणि हळदीचं दुकान असल्याचा दावाही सुनील देशमुख यांनी केला आहे.
नागपूर येथील मार्क एजन्सीच्या कोटेशनमध्ये याच व्हेंटिलेटरची किंमत 12 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच 20 व्हेंटिलेटर घेतल्यास 10 लाख रुपयांत एक व्हेंटिलेटर देण्याची तयारी मार्क एजन्सीने दर्शवली होती, असा दावाही करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सुनील देशमुख यांनी सांगितलं आहे.दरम्यान, फलटणमधील डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरणातही कुटुंबीय आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रुग्णालयासमोर मृतदेह ठेवून कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे.
डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मृतदेह मुंबईहून फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर आणण्यात आला. त्यानंतर मृतदेह रुग्णालयासमोर ठेवून ग्रामस्थ आणि नातेवाईकांचं आंदोलन सुरू आहे.डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य उपसंचालक भगवान पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसंच उपजिल्हा रुग्णालयाच्या उपअधीक्षक लीला मदने आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा दावा करणारे प्रसाद कोंडे देशमुख यांना अटक करून तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केली आहे.कुटुंबाला तात्काळ एक कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांसाठी डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दोषींना तात्काळ अटक करून कारवाई झाली नाही आणि मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.सध्या फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




