खासगी दुचाकी चालकांनाही प्रवासी वाहतुकीची परवानगी द्या; नितीन गडकरींचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

खासगी दुचाकी चालकांनाही प्रवासी वाहतुकीची परवानगी द्या; नितीन गडकरींचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्य सरकारांना बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. या क्षेत्रातून तब्बल आठ कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.तसेच, सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी नवीन ‘निगेटिव्ह-पॉइंट’ प्रणाली लागू करण्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रणालीअंतर्गत वारंवार नियम तोडणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो.दिल्लीमध्ये रस्ते सुरक्षा संदर्भातील ‘सुरक्षा’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.

“आम्ही बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे, मात्र काही राज्यांमध्ये अद्याप परवानगी नाही. वाहतूक हा राज्याचा विषय आहे. बाईक टॅक्सीमुळे अनेकांना उपजीविकेचे साधन मिळू शकते. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्कूटर आणि मोटरसायकलसारख्या खासगी दुचाकींच्या चालकांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी,” असे आवाहन नितीन गडकरी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.

गडकरी यांनी सांगितले की, आतापर्यंत खासगी बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सुमारे चार कोटी रोजगार उपलब्ध झाले आहेत. तर रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवेमुळे सुमारे दोन कोटी रोजगार निर्माण झाले आहेत. विविध राज्य सरकारांनी बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास या माध्यमातून तब्बल आठ कोटी रोजगार उपलब्ध होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.दरम्यान, महामार्ग, खाणकाम आणि बांधकाम यांसारख्या उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रातील सुमारे 10 लाख चालक आणि कामगारांना मोफत आरोग्य तपासणी आणि समुपदेशन देण्यासाठी ‘सुरक्षा’ या प्रायोगिक उपक्रमाचा गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात नागपूर आणि कामठी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग-44 वर तसेच चंद्रपूरमधील खाणकाम क्षेत्रात सुमारे 10 हजार लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गडकरी यांच्या माहितीनुसार, भारतात दुचाकी अपघातांमध्ये 81 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे, जी जगातील सर्वाधिक संख्या असल्याचे त्यांनी सांगितले.

सीट बेल्ट न लावणे, हिट-अँड-रनच्या घटना, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.सीट बेल्ट न लावल्यामुळे 14 हजार 466 मृत्यू झाले आहेत, तर हिट-अँड-रनच्या घटनांमध्ये 34 हजार 30 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता वाहनचालकांचे योग्य प्रशिक्षण, नियमित आरोग्य तपासणी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.