जिल्ह्यात ६१ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा इशारा पातळीकडे ; आजपासून पावसाचा जोर ओसरणार

जिल्ह्यात ६१ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा इशारा पातळीकडे ; आजपासून पावसाचा जोर ओसरणार

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. सलग पडणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, तब्बल ६१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पंचगंगा नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले असून दिवसेंदिवस पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढवताना दिसत आहे. 

     १ जुलैपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पूल आणि ओढ्यांवर पाणी आले आहे. परिणामी ६ राज्य मार्ग आणि ११ जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले असून येथील वाहतूक सध्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. ऐतिहासिक राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी ३६.८ फुटांवर पोहोचली असून, नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे.


    आज जरी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची थोडी उघडझाप सुरू असली, तरी धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


    मात्र, कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज बुधवारपासून बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील १० दिवस सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता असून कमाल तापमानात वाढ होऊ शकते.