नागरी सहकारी बँकांना योग्य ते सहकार्य करू- सतीश मराठे

नागरी सहकारी बँकांना योग्य ते सहकार्य करू- सतीश मराठे

कोल्हापूर (प्रतिनिधी): रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिश मराठे यांच्या समवेत २६ जून रोजी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांच्यात सदिच्छा भेट झाली, यावेळी त्यांनी नागरी सहकारी बँकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

असोसिएशनचे वतीने सदस्य बँकांनी दिलेल्या तपशिलाच्या आधारे अडचणींचा सविस्तर लेखी स्वरुपात गोषवारा मांडला. याला उत्तर देताना सतिश मराठे यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागरी सहकारी बँकांविषयी कडक धोरण असण्याला दुजोरा दिला, मात्र काही नागरी सहकारी बँकांच्या अडचणी मध्ये वाढ झाल्याने अशा प्रकारचे सर्वसाधारण धोरण राबविले जाते हे मान्य केले. अशा परिस्थितीमध्ये स्वतः मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत काही तत्वांचे समर्थन केले मात्र काही तत्वे जाचक असलेचे मान्य करून त्याबाबत नागरी सहकारी बँकांच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयांच्या समोर स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे आश्वासन दिले.

असोसिएशन मार्फत सदर केलेल्या निवेदनामध्ये नागरी सहकारी बँकांच्या समस्या खालीलप्रमाणे मांडण्यात आल्या. नवीन शाखा उघडताना भेडसावणाऱ्या अडचणीमध्ये हेडरुम कॅपीटल मर्यादा, बँकांना मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करणेसाठी नेटवर्थची घातलेली मर्यादा, सोने-चांदी तारण कर्ज देणेबाबत असलेल्या जाचक अटी, PMC बँकेतील गुंतवणूक अनुषंगाने युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या PNCPS रोख्यांसाठी मूल्यमापन मार्गदर्शक तत्त्वे आणि तरतूदविषयक निकषांची विनंती, बँकिंग नियमन कायद्यांतर्गत सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळातील बदल आणि त्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीबाबत, DPDP अॅक्ट अंतिम मुदतीमध्ये वाढ होवून मार्च २०२९ पर्यंत मुदत होणेबाबत, बँकांच्या कर्जविषयक एक्सपोजरचे निकषबाबत, UPI शुल्क आकारणीबाबत इत्यादी मुद्यांवर सविस्तर चर्चाविनियम करणेत आली,तसेच काही धोरणे नागरी सहकारी बँकांना सध्या जाचक ठरत आहेत. याबाबतीत फेरविचार करणे अपेक्षित असल्याने त्यासाठी जरूर ते  सहकार्य करण्याचे आश्वासन सतिश मराठे  यांनी दिले. नागरी सहकारी बँका सर्व सामन्यांच्यासाठी वरदान असल्याने त्या टिकवण्याची गरज असलेचे त्यांनी नमूद केले.

यावेळी वीरशैव बँक अध्यक्ष सतीश घाळी, उपाध्यक्ष वैभव सावर्डेकर, पंचगंगा बँक असोसिएशन संचालक राजाराम शिपुगडे, असोसिएशनचे तज्ञ संचालक दत्तात्रय राऊत, बैंकिग तज्ञ शंकर मांगलेकर, असोसिएशनचे सीईओ सुरेश शिंदे, आजरा अर्बन बँक सीईओ प्रशांत गंभीर, पंचगंगा बँक सीईओ दिपक फडणीस, वीरशैव बँक सीईओ प्रकाश पाटील, कमर्शिअल बँक सीईओ सुधिर कदम, महालक्ष्मी बैंक सीईओ राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.