मोदी कॅबिनेट विस्तारात मोठे बदल? श्रीकांत शिंदे, संजय जाधव चर्चेत; प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद धोक्यात?

मोदी कॅबिनेट विस्तारात मोठे बदल? श्रीकांत शिंदे, संजय जाधव चर्चेत; प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद धोक्यात?

दिल्ली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (30 जून) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून आज भारतात परतणार असून, त्यानंतर पुन्हा परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या संभाव्य विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये किंवा पदांमध्ये बदल होऊ शकतात. महाराष्ट्रातून विशेषतः शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्रीपदासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद असल्याची चर्चा आहे.तर राज्यमंत्रीपदासाठी सध्याचे आयुष खात्याचे स्वतंत्र प्रभार मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जागी परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. संजय जाधव सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले असून, अलीकडेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांमध्ये ते ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.

प्रतापराव जाधव यांच्याकडे सध्या आयुष खात्याबरोबरच आरोग्य मंत्रालयातील राज्यमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्या कामकाजाबाबत केंद्रात नाराजी असल्याची चर्चा राजकीय सूत्रांकडून केली जात आहे. त्यामुळे संभाव्य विस्तारात त्यांचे मंत्रिपद कायम राहणार की बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, राज्यमंत्रीपद विदर्भात कायम ठेवायचे की मराठवाड्याला प्रतिनिधित्व द्यायचे, यावरही शिंदे गटात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मराठवाड्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी संजय जाधव यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे.

याच पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतेच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनीही सुमारे चार किलोमीटर पायी चालत दर्शन घेतल्याने त्यांच्या नावांची राजकीय चर्चाही रंगली आहे.ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिंदे गटाचे केंद्रातील राजकीय वजन वाढले असून, त्याचा फायदा मंत्रिमंडळ विस्तारात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.