गॅस जोडणी मिळण्यासाठी आवश्यक परवानग्या

गॅस जोडणी मिळण्यासाठी आवश्यक परवानग्या

पुणे (प्रतिनिधी) : पिंपरी शहरातील नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सुलभ नैसर्गिक गॅस सेवा उपलब्ध व्हावी तसेच नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांना गॅस जोडणी मिळण्यासाठी आवश्यक परवानग्या तातडीने देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात नैसर्गिक वायू वितरणाशी संबंधित विविध कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) अधिकारी, महापौर रवी लांडगे आणि हाॅटेल असोसिएशनचे पदाधिकारी यांची महापालिका भवनात सोमवारी दि. १६ रोजी बैठक झाली. यावेळी महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, व्यावसायिक संचालक शंकर करजगी, भाग्यश्री मंथलकर, पिंपरी-चिंचवड हाॅटेल अँड रेस्टाॅरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे, सचिव तेजस जुनवणे आदी उपस्थित होते.

शहरात एमएनजीएलमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी महापालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या लवकरात लवकर कशा देता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. घरगुती वापरासोबतच हॉटेल्स व खाणावळींना नैसर्गिक गॅस उपलब्ध झाल्यास इंधनाचा खर्च कमी होण्याबरोबरच पर्यावरणपूरक व्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीनंतर एमएनजीएलच्या शिष्टमंडळासह महापौर लांडगे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना परवानगी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.