ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीचे वर्चस्व; अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड
मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणी निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपा-शिवसेना महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे राजकीय गणित यशस्वी ठरत अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील, तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर यांची निवड झाली.

कार्यकारिणी निवडणुकीत सहकार आणि परिवर्तन अशा दोन पॅनलमध्ये लढत झाली होती. बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने दोन्ही पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करत वेगळी रणनीती आखली होती. या रणनीतीमुळे दोन्ही पॅनलमधून महायुतीचे एकूण १४ उमेदवार विजयी झाले होते.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने १७, तर बहुजन विकास आघाडीच्या बाजूने ७ मतांची नोंद झाली. कार्यकारिणी निवडणुकीत आमनेसामने असलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, शिवसेनेचे एक मत फुटल्याचीही चर्चा रंगली.
या निकालानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व संपुष्टात येत महायुतीने बँकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.




