धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस कायम! वरिष्ठांच्या कारवाईनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ

धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस कायम! वरिष्ठांच्या कारवाईनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. भाजपमधील अंतर्गत गटबाजीतूनच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्यासाठी ‘भावी खासदार’ अशी बॅनरबाजी करणारे युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल काकडे यांची पदावरून उचल बांगडी झाल्याची चर्चा होती.

यानंतर राहुल काकडे यांच्या जागी गणेश इंगळगी यांची नव्याने अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता गणेश इंगळगी यांचीच मल्हार पाटील यांच्या समर्थनातील पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांच्यासोबतच भाजपचे काही नगरसेवक आणि तरुण पदाधिकाऱ्यांकडून ‘आरंभ नव्या युगाचा, कधीही न संपणाऱ्या मल्हार पर्वाचा’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अचानकपणे मल्हार पाटील समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.धाराशिवच्या राजकीय वर्तुळात ‘आरंभ नव्या युगाचा, कधीही न संपणाऱ्या मल्हार पर्वाचा’ या आशयाची भाजप युवा मोर्चाच्या नव्या जिल्हाध्यक्षांची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे माजी जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांनी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ ‘भावी खासदार’ म्हणून केलेल्या बॅनरबाजीमुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा होती.

मात्र, नव्याने अध्यक्ष झालेल्या गणेश इंगळगी यांच्याकडूनही मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात आल्याने पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर सुरू असलेला हा ट्रेंड सध्या चांगलाच चर्चेत आहे.

यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणखी वाढली आहे का? तसेच पक्षातील तरुण फळी मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ उघडपणे उतरली आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरील या पोस्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल काकडे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ ‘भावी खासदार’ असा उल्लेख असलेली बॅनरबाजी केली होती.

या प्रकारामुळे भाजपमधील एका गटात नाराजी निर्माण झाल्याची आणि पक्षांतर्गत धुसफूस वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याच मुद्द्यावरून राहुल काकडे यांच्यावर पक्षाने कारवाई केल्याचीही चर्चा होती.मात्र, राहुल काकडे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच भविष्यात पक्षाकडून आपल्याला आणखी मोठी जबाबदारी मिळेल, असंही त्यांनी म्हटलं होतं.

असं असतानाच आता नव्याने अध्यक्ष झालेल्या गणेश इंगळगी यांच्याकडूनही मल्हार पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात आल्याने भाजपमधील या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.