नाशिक म्हाडा घोटाळा: अनिल परब संतापले, उदय सामंत यांनी दिली कारवाईची माहिती

नाशिक म्हाडा घोटाळा: अनिल परब संतापले, उदय सामंत यांनी दिली कारवाईची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकसह महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जमिनीची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या घरांचा आणि राखीव जागांचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. नियमांना बगल देण्यासाठी विकासक आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे तुकडे पाडण्यात आल्याचे त्यांनी सभागृहात मांडले.

परब यांच्या मते, 1981 च्या परिपत्रकाचे उल्लंघन करून 4000 चौ.मी. पेक्षा कमी प्लॉट तयार करण्यात आले. ना हरकत प्रमाणपत्र न घेता ले-आऊट मंजूर करण्यात आले असून म्हाडासाठी असलेले 20 टक्के आरक्षण, 10 टक्के खुली जागा आणि 5 टक्के सुविधा क्षेत्रही बेकायदेशीररीत्या कमी करण्यात आले. अशा प्रकारे 200 हून अधिक प्रकरणे नाशिकमध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी पिंकेश शहा या बिल्डरचा उल्लेख करत म्हाडाला 164 फ्लॅट न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. “फक्त 49 जणांवरच गुन्हे का? उर्वरित दोषींवर कारवाई कधी होणार? बेकायदेशीररीत्या ढापलेली जमीन सरकार परत कशी घेणार?” असे सवाल त्यांनी सरकारला केले.

या आरोपांना उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 49 जणांवर गुन्हे दाखल झाले असून त्यात उपअधीक्षक आणि नायब तहसीलदार यांचाही समावेश आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल 18 ऑगस्टपर्यंत सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.