नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर

नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर बुलडोझर

मुंबई (प्रतिनिधि) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडाका लावत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर, बीडमधून अनेकांना अटक केली आहे. याप्रकरणी, सीबीआयकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून काही आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणात पेपरफुटीचा मास्टरमाईंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी याच्यावर प्रशासनाने तोडक-मोडक कारवाई सुरू केल्याचं दिसून येत आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात सुरू असलेल्या बांधकामावर अखेर हातोडा मारण्यात आला आहे. 

नगरपालिका प्रशासनाने सदरील बांधकाम संबंधित ठेकेदाराने स्वतः पाडून घ्यावे याकरिता नोटीस बजावली होती. मात्र, प्रसासनाच्या या नोटीसीचा आज अल्टिमेटम संपला आहे, त्यामुळे या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जात आहे. विशेष म्हणजे स्वतः संबंधित ठेकेदाराकडून अनधिकृत असलेले बांधकाम पाडले जात आहे. देशभरात गाजत असलेल्या आणि देशभरातून संताप व्यक्त होत असलेल्या, 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या नीट पेपर फुटीच्या घोटाळ्यात सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीचे नाव आले होते, त्यानंतर सीबीआयने त्यांना अटकही केली. याप्रकरणी, कारवाईला वेग आला असून पी.व्ही. कुलकर्णी हे मूळ बीडमधील असल्याने त्यांचे शहरातील शाहू नगर भागात चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर, या बांधकामातील अवैधते बाबात पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावल्यानंतर हे पाडकाम केले जात आहे. 

नीट पेपरफुटीप्रकरणात सीबीआयने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी या दोघांना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या बाबतीत तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आले आहेत. लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी क्लासेस घ्यायचा. आधी मोटेगावकर क्लासेसमध्ये देखील "प्लॅटिनम गोल्ड बॅच" चालायची अशी माहिती समोर आली आहे. प्लॅटिनम गोल्ड बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जायचे. दरम्यान, सीबीआयकडून आरोपी कुलकर्णी-मोटेगावकर-शिरुरे नेक्ससबाबत तपास सुरू आहे.

नीट पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर लातूरमध्ये झालेल्या तपास आणि चौकशीनंतर पी.व्ही.कुलकर्णीला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुलकर्णी हा चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला असल्याची माहिती आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या तो संपर्कात असल्याचंही तपासात समोर आलं आहे. याच धाग्यावरून सीबीआयचे पथक लातूरपर्यंत पोहोचले. त्यानंतर कुलकर्णीची सखोल चौकशी करण्यात आली. लातूरच्या कैलासनगरमध्ये कुलकर्णी राहायचा, तर त्याचे कुटुंब पुण्यात राहत असल्याची माहिती आहे. कुलकर्णी हा मूळ बीडचा असून सध्या त्याने बीडमध्ये 4 मजली बांधकाम सुरू केले आहे.