पंतप्रधान मोदींनी 25 कोटी नागरिकांना तीव्र दारिद्र्यातून बाहेर काढले; दशकातील मोठी कामगिरी – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदींनी 25 कोटी नागरिकांना तीव्र दारिद्र्यातून बाहेर काढले; दशकातील मोठी कामगिरी – देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत विविध क्षेत्रांतील कामगिरीचा उल्लेख केला. मोदी यांनी 4,398 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू  यांच्या सर्वाधिक काळ निवडून आलेल्या पंतप्रधानांच्या विक्रमाला मागे टाकल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, कार्यकाळाची लांबी महत्त्वाची असली तरी जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवणे आणि देशाला नवे नेतृत्व देणे ही मोदी यांची खरी कामगिरी आहे. एनडीए आज देशातील 22 राज्यांमध्ये सत्तेत असून देशाच्या बहुतांश भूभागावर एनडीए सरकार कार्यरत आहेत. तसेच, भाजपचा विस्तार देशाच्या विविध भागांत झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत सुमारे 25 कोटी नागरिक तीव्र दारिद्र्याच्या स्थितीतून बाहेर आले असून ही या दशकातील मोठी उपलब्धी मानली जाऊ शकते. त्यामुळे मोदी हे केवळ सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले नव्हे, तर प्रभावी पंतप्रधानांपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.फडणवीस यांनी पुढे सांगितले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले असून त्यापैकी 22 सर्वोच्च दर्जाचे आहेत. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वाटचाल करत आहे. जीएसटी संकलन, डिजिटल व्यवहार, यूपीआयचा वाढता वापर, करसंकलनातील वाढ आणि सेमिकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूक यांसारख्या बाबींमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे.

त्यांनी विविध कल्याणकारी योजनांचाही उल्लेख केला. अन्न सुरक्षा योजनेद्वारे 81 कोटी नागरिकांना लाभ मिळत असल्याचे, किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्यात आल्याचे तसेच महिलांच्या जनधन खात्यांपासून ते आरोग्य आणि गृहनिर्माण योजनांपर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, दूध उत्पादनातील वाढ, सूक्ष्म सिंचनाचा विस्तार, आयकर सवलतीतील वाढ आणिक प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत लाखो घरे उभारण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.