पाण्याअभावी मोसंबी बागेवर जेसीबी" किंवा "वाळलेली मोसंबी बाग उद्ध्वस्त
बीड (प्रतिनिधी) : उन्हाळा संपायला आला असून पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे, गेल्या 3 महिन्यांपासून उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.उन्हाळा संपत आल्याने नागरिकांना दिलासा आहे, पण दुसरीकडे पाण्याअभावी शेतकरी चिंतेत आहे. पाण्याअभावी फळबागांचं नुकसान होत असल्याने शेतकरी व्याकूळ झाल्याचं दिसून येत आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग गाव मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु, पाण्याअभावी या भागातील अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवर जेसीबी चालवण्याची वेळ आलीय.या भागातील दिनेश गुळवे या शेतकऱ्याच्या शेतातील मोसंबीची बाग उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळून गेल्याने त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
आपली मोसंबीची बाग वाळून गेल्याने शेतकरी गुळवे यांनी त्यावर थेट जेसीबी चालवला, एवढेच नाही तर या मोसंबीच्या झाडांची शेतातच होळी करत आपला संताप देखील व्यक्त केला.शासनाने तातडीने या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी आणि जायकवाडीतील पाणी सिंदफणा खोऱ्यामध्ये उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.




